‘फादर भंडारी यांनी अनेक हिऱ्यांना पैलू पाडले ‘- मॉ. फ्रान्सिस कोरिया
ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा, विरार यांच्या वतीने ‘फादर भंडारी: एक कर्मयोगी’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानात उपस्थितांना संबोधित करताना माँसीनियर फ्रान्सिस कोरिया म्हणाले, फादर भंडारी यांनी नंदाखाल आणि सांडोर येथील अनेक हिऱ्यांना पैलू पाडले .फादर भंडारी यांनी आयुष्यभर मोती वेचण्याचे काम केले .फादर भंडारी यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविताना माँ.फ्रान्सिस कोरिया म्हणाले ,फादर भंडारी हे हाडामांसाचे खरेखुरे शिक्षक होते. त्यांनी स्वतःला प्रभू येशूचे पाईक म्हणून येशूचे शिक्षण शिकविण्याचे कार्य पुढे नेले. सदर व्याख्यान टॉक शो च्या स्वरुपात घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोजा यांनी माँ. फ्रान्सिस कोरिया यांना फादर भंडारी यांच्या संदर्भातील विविध प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस फादर भंडारी यांच्या चित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदीप मंडळाचे सचिव श्री स्टॅनिसलॉस लोबो यांनी केले. सदर कार्यक्रमात बोलताना ज्ञानदीप मंडळाचे प्रेसिडेंट म्हणाले , फादर भंडारी यांनी जुन्या काळी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले .सदर कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष आलेक्स तुस्कानो , जॉन डिमेलो, माजी प्रमुख विश्वस्त विन्सेंट डिमोंते, व्यलेरियन मचाडो आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहज, सोप्या आणि ओघवत्या भाषेत प्राध्यापक जगदीश संसारे यांनी केले . ज्ञानदीप मंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट ज्यो अल्फान्सो यांनी उपस्थितांचे आभार मानले .